Tuesday, 8 June 2010

पाऊस..

     पाऊस...पाऊस...पाऊस म्हणजे नुसतीच गंमत एवढाच काय ते आठवतंय.कधी काळे गडगडती ढग तर कधी स्वच्छ  आभाळ...मनाला तजेला देणारं.
        लहानपणी पाऊस म्हणजे शाळेला सुट्टी नाहीतर शाळातरी लवकर सुटायची.मग भिजत..भिजत घरापर्यंतचा प्रवास.खूप मजेशीर होते ते दिवस.कुठेही थांबून खेळत बसायचे मैत्रिणींसोबत. चिखल म्हणजे जिवलग मित्र माझा...पावसाळ्यातला.आई बाहेरून ओरडायची.तरीही मी चिखलात खेळायचे...तर कधी मातीची भांडी बनवत बसायचे .भांडी बनवणे     हा माझा आवडता उद्योग होता.
        सायकल आली तेव्हा मात्र मला चिखल नकोसा वाटू लागला.सगळे कपडे खराब व्हायचे चिखला-मातीचे.पावसात बरच वेळ खो-खो खेळल्याचा मात्र मला आजही स्पष्ट आठवतय.शाळेत आम्हला कुणीच तेव्हा रागावलेल नव्हतं.सुट्टीच्या दिवशी तर मुद्दामच पावसात भिजायचे.पायरीवर बसून पाऊस बघत बसायचे.गारा उचलून डब्यात भरून खूप खूप खेळायचे.
       आत्ताच्या पावसात मी प्रत्यक्ष भिजत नाही,खूप खेळत नाही.खिडकीतून मनसोक्त पाहायला मात्र सोडत नाही.प्रत्यक्ष भिजले नाही तरी मनाला तजेला येत असतो.पावसात भिजल्यासारखाच आंनद मात्र येत असतो.त्यातच..भिजतांना दूर मी विचारत निघून जाते.लहानपणीच्या त्या भांड्यांचा आकार अजूनही सुधरवित असते.आत्ता आई ओरडत नाही घरत येण्यासाठी.मीही खिडकीतच थांबते चिखलाची गोष्ट स्मरण्यासाठी.
         चहाचा कप आणि मी पावसाला बऱ्याचदा सोबत असतो.प्रत्येक पावसानंतर मात्र मी मोठी झाल्याचा भास जाणवत असतो.पाऊस मला आवडतो.मात्र ते भास नाही.याची जाणीव झाल्यावर पाय खिडकीजवळून अलगद सरकतो.थोडा वेळ सोफ्यावर बसून अलगद खिडकीकडे वळते.आणि पाऊस जिंकल्यासारखा जोरदार पडत असतो.

1 comment:

Pages