Friday 22 November 2013

कसं ना ?

आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.
आणि ठरवून विसरायचं,
तर भुंग्यासारखं डोक्यात राहतं .

चावी हरवू नये म्हणून,
जागेवरच ठेवते मी.
निघतांना कुणास ठावूक
जागाच अचानक विसरते मी.

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.

वाढदिवस लक्षात राहतो ,
नेमकी त्याच दिवशी विसरते मी .
आणि उशिरा फोन केल्याबद्द्ल
आधीच  माफीही मागते मी..

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.

आता माझ्या लक्षात होतं ..
नक्की काय काय मांडायचं मी.
 सुरवात जोमात केली पण
आता जाम विसरलीच हो मी . :(

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.

कागदपत्र  असो कि पुस्तकं ,
मी अचूक लक्षात ठेवते जागा.
गरजेच्या वेळी मात्र
माझाच माझ्यावर होतो त्रागा .

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.

आता वय झालं म्हणू नका ,
अजून सोळाच …जास्त नाही.
कालच कुणीतरी विचारलं तेंव्हा ,
वयाचं पक्कं आठवलं नाही .:) :)

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं. 

Monday 4 November 2013

ऑटम

"ऑटम" …. पानगळतीचा  ऋतू… कधीचा नुसता डोक्यात भुंग्यासारखा घुसलाय. हसताय काय?साधा सुधा नाही हं
… बाहेर पडलं कि या बहरलेल्या मनमोहक वृक्षांकडे बघून तर तो सारखा मी काहीतरी व्यक्त करायचं ठेवलाय त्याबद्दल असा सारखा हिशोब काढत असतो. तसा त्याला संपून अगदीच काही वेळ नाही झाला असे मला वाटत असते….अगदी तो पुन्हा यायची वेळ येईपर्यंत…. म्हणजे कदाचित हा ऋतू आपल्याला जाम आवडतो असाच आहे बहुदा. याच्या नुसत्या नावानेही आपल्या डोक्यात सळसळ होते… अन गळून पडलेली ती लाल,पिवळी पानं ढिगाढिगाने हजर होतात . तरी मी कित्ती टाळलं होतं मला त्याला लिहीत बसायचं नाही पण… आता अगदीच राहवत नाही. एकदाची त्यालाही मुक्ती द्यायला पाहिजे नाही का?हो … नाही पण अख्खा मोसम हि कसली डोलतं असतात वृक्षावर.आणि जातांना धरतीला अस्तित्वाने सौंदर्य त्यागून जाणं म्हणजे महानतेची सीमाच नाही का?पण ती वाळकी पानं आणि रिक्त सुकेलेल्या फांदीचे एकटेपण पाहून वाईटही वाटते अन नव्या बहरची चाहूलही. कसली गंमत नाही का?खेद तोही आल्हाददायी पानगळतीचा आणि हुरहूर,प्रसन्नता,चाहूल नव्या पालवीची... नव्या सुरवातीची,भरभराटीची. असोत…. पण मानवाचे आयुष्य देखील असेच नाही का?जन्म,पालवी,उत्साह ,भरभराट अन पुन्हा पानगळती… "आम्ही चालतो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा". नाही जास्त गंभीर नका होऊ.ते आपला हा 'ऑटम ' ह्याच संदर्भाची जाणीव करून देण्यास पाठलाग करीत होता बहुदा माझा म्हणून म्हटला एकदाचं व्यक्त करावं म्हणजे मुक्ती त्यालाही अन मला समाधान त्याला 'ती' दिल्याची. पण त्या अव्यक्त,संमिश्र भावना या सुखद आहेत मलातरी. तुम्हालाही बहुदा तश्याच असतील हो ना ?

Sunday 3 November 2013

लहानपण देगा देवा! 1

                                                 भाग १
  वय वर्ष … किती ते विचारू नका.पण  आता नक्कीच लहान नाही मी. ठेवलं  आहे लहाण  ती वेगळी गोष्ट.
 असोत. तश्या बऱ्याच आठवणी आहेत माझ्या बालपणाच्या…प्रत्येकाच्या  असतात. चांगल्या आणि वाईटहि . चांगल्या बघु कारण  माझ्या चांगल्याच आहेत.दादा म्हणजे माझे वडील माझे आदर्श अर्थात "हिरो "होते . समाजसेवक असल्याने घरात  सतत गजबज. आणि कुठ्ल्या कुठल्या संस्था तसेच समाजसेवेच्या दृष्टीने होणाऱ्या सभा आणि संमेलनात त्यांचा सततचा समावेश असे.मी घरात लहान असल्याने आणि मोठी भावंड त्यांच्याच अभ्यासाच्या व्यापात असल्याने माझी जबाबदारी त्यांच्याकडेच  असे. मग बाजारहाट म्हणा कि इतर काही. तसं एकदिवस एका महत्वाची बैठक अर्थात "मीटिंग " चालू होती. घरातच होती.त्यावेळी बहुदा मी ६ वर्ष्याची असावी.. दिवसभर खेळून दमलेली मी बिचारी....  दादांजवळ "मीटिंग " मध्ये जाऊन बसली. अजूनही स्पष्ट आठवते मला पाय भारीच दुखत होते. आणि हे असे दुखले म्हणजे आई किंवा दादा दाबून द्यायचे माझे पाय . भारी मज्जा होती बघा. अहाहा  काय वय होतं ते… अहम-अहम म्हणजे बरं वाटतं न आपली कुणी अशी सेवा म्हणजे काळजी  म्ह्णते हो मी केली तर …. नाही तर तुमचा आपलं काहीतरीच अर्थ काढाल ह . असो… आता पाय दाबून घ्यावेसे वाटत होते. दादांचं आपलं काहीतरी महत्वाचं मुद्दे मांडणं चालू होतं. आता ???हे  पाय दुखणं कसं थांबवणार?आई तर स्वयंपाक करते. आणि तिला इतक्या लोकांचं खाणं-पिणं करायचं होतं. बाजूला बसलेल्या माझ्या लाडक्या 'कर्डिले'बाबां कडे मोर्चा वळवला. "बाबा !पाय खूप दुखताये दाबून द्या न…." क्षणभर मीटिंग मधेही शांतता. कारण बाबा खरचं बाबा होते. म्हणजे  वयाने फार मोठे आणि मीटिंगचे  कदाचित अध्यक्षच…. आठवत नाही इतके आता . "सोन्याबाई दाबतो हं जरा इकडे वळवा  पाय माझ्या दिशेने " म्हणून .. पाय दाबले त्यांनी माझे चक्क . ह्या मोठ्या २०-२५ लोकांच्या सभेत अगदी न चिडता. मीटिंग चालू होती नंतर पण तेव्हा मला काय झाला खी समजला नव्हतं. इतकं नक्कीच आठवतं कि असल्या पाय दाबनं सेवेनंतर मी निद्रा देवीची आराधना केली लगेचच. 
               त्यानंतर बऱ्याचदा मला माझ्या दादांनीहि आणि खुद्द बाबांनीही या प्रसंगाची आठवण कित्येकदा करून दिली. अर्थात विनोदाने .दादा व इतर मंडळीस त्या गोष्टीचा हेवा वाटे.पण मला त्याची अजिबात जाणीव नव्हती. आज मला हा प्रसंग जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा-तेव्हा मला खजील झाल्यासारखे वाटते.लहानपणी एक सोपी म्हण सतत लक्षात असे,"मोठेपणा हा वयावर अवलंबून नसून तो कर्तुत्वावर अवलंबून असतो." बाबांचं असं वागणं हा खरा मोठेपणा नाही का ?नाहीतर त्यांनी देखील त्यांच्या वयानुसार आणि पदानुसार मला हटकून लावलं असतं हो ना ? या  आठवणीवरून एक गोष्ट थेट हृदयाला भिडते आणि मनाला 'माणूस' म्हणून सतत जाणीव करून देते माणसाचा मोठेपणा,विनम्रपणा हा त्याच्या 'डीग्री' वर अवलंबून नाही तर साधेपणावर आणि पुढ्यात आलेली गोष्ट सहजपणे निभावून नेण्यात आहे हेच खरं  नाही का?
ठरवलेलं तेव्हा तेव्हा.. 
 गड सहज पार केला. 
काही ठिकाणी फक्त.. 
ठरवायचं  तेवढं राहून गेलं.:)

Thursday 1 August 2013

मुझको भी तरकीब सिखा यार जुलाहे!

       गुलझार म्हणजे इंदधनुष्य.एक एक गझल असली कातील आणि खोल अर्थपूर्ण. त्यापैकी मुझको भी एक तरकीब सिखा  दो म्हणजे फार विचार करायला लावणारी शब्दरचना. 
मुझको भी तरकीब सिखा यार जुलाहे
अकसर तुझको देखा है कि ताना बुनते
जब कोइ तागा टुट गया या खत्म हुआ
फिर से बांध के
और सिरा कोई जोड़ के उसमे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकि
इक भी गांठ गिराह बुन्तर की
देख नहीं सकता कोई
         विणताणांचा धागा जोडणं किती सोपं आहे.खरचं एकही गाठ बघण्यास चांगली देखील वाटत नाही.रोजच्या  आयुष्यात आपल्याला ह्याच्यासारखं जमतच कुठे?ते सामान्य माणसाचं काम नव्हेच.त्यासाठी उच्च कोटीचा समजूतदारपणा लागतो. साधा गोष्टीवरून मन उदास झाले कि डोक्यात असंख्य विचारप्रवाह चालू होतात.आई म्हणते,"कुठल्याही गोष्टीने वाईट वाटलं कि मन पोखरून काढण्यापेक्षा पक्षासारखं वागावं. पाऊस आला तरी पंख झटकून पुन्हा उडता आलं पाहिजे.अवघड असलं  तरी अशक्य नक्कीच नहि." अर्थात हे मी काढलेले अर्थ.प्रत्येकाचा थोडाफार वेगळा असू शकतो.तुम्ही काय काढलात तेही नक्की सांगा  आई म्हणा किंवा हा विणकर एकच गोष्ट  सांगताय हे खंर. आपणही पुन्हा पुढला धागा विनण्याचा  आणि पंख झटकून भारी घेण्याचा १००% प्रयन्त करुया.आणि आपणहून तरकीब काढूया. हो ना ?

Monday 20 May 2013

उरी काहूर
अजब हुरहूर
नजर आतुर
 कटाक्ष दूरदूर

हृदयी ठोका...
चाले भरभर
मन भिरभिर
 वाऱ्यावर..

नेत्री चाहूल
शिरशिरी अंगावर
कसली ज्यादू हि ?
चित्त न ठिकाणावर

कधी उगाच पडे
खळी गालावर.
तर उगाच झुले झुला
उंच उंच झाडावर

 विचार अडकले
नाजूक ओठावर.
लाजलाजुनी लाल परी
ओझे मनीचे फुलांवर

दूर किनारी लाट दाटली
 फेसाळ होऊन तरंगावर
हे असले स्वप्न नशिले?
 कसले जाळे मनावर?

मीच घेतला हात हाती..
अन भर टाकला खांद्यावर
नाजूक बट पसरली
फुंकले तिला गालावर

लाजून  हसले क्षणभर सजले
चित्त विरून भान फिरकले
 अलगद उतरली स्वप्नभेट
पुन्हा डोळ्याच्या किनाऱ्यावर





Monday 13 May 2013

माझे मलाच मीही समजावयास होते
झाले कधी न पूर्वी ते व्हावयास का होते?

केली किती उपवासे अन पारायानेही श्रध्देने
त्यास व्यर्थ समजुनी मी बावरायास का होते?

लाख म्हणाले कुणी पाझर फुटे दगडाला 
मग तो फुटेपर्यंत पुन्हा हृदय पाषाण व्हावयास का होते?

Sunday 12 May 2013

शब्द


शब्द जिव्हारी लागे लागे,
शब्दच देती अपार माया.  
शब्द सुगंधी सडा मोगरा, 
अन तेच शस्त्रही मुखवटे ओळखाया. 

शब्द जप-जप साधू संतांचा,
शब्द कातीली गुन्हेगारांचा. 
शब्द मलमली आपलेपणाचा, 
अन खोल घाव त्या खुमशी प्रवृत्तीचा. 

शब्द हास्य कोवळ्या गालांचा, 
शब्द गंज अपरिवर्तनाचा.  
शब्द  असे प्रमादहि ..शहाणपणातला,
शब्द पुरावा जिवंतपणीचा.. 
वाहे हा शब्द्झरा.... शब्द झरा. 

Wednesday 8 May 2013

कधी कधी ..

कोरून कोरून लिहावेसे वाटते,
आभाळाच्या या निळसर पाटीवर.
 तर कधी वाटते होऊन रिमझिम पाऊस,
बरसत राहावे सुगंधी मातीवर. 

वाटे मजला कधी कधी तर, 
झुळूक व्हावे  वाऱ्याची. 
आणि होऊनी मंद बासुरी, 
गीत गावे पक्ष्यांच्या कानाशी. 

कधी वाटे मजला,
एकरूप व्हावे हिरव्यागार वृक्षांशी.  
आणि उरून राहावे उभारी बनून, 
मानवाच्या भावूक नजरेशी. 

रूप घ्यावे वेगवेगळे अन, 
ज्यादूपरी खेळावे मनझोकयाशी. 
मिळे एकदाच  आयुष्य हे, 
कवटाळावे त्यास हृदयाशी. 




Thursday 2 May 2013

असे किती बोलायचे
शब्दात आले नाही
भावना आणि शब्दांचा
हा खेळ नवा नाही

कविता आणि कागद
हे समीकरण लावू नका
अश्या मनातल्या भावनांवर
अत्याचार करू नका

ते बरसतील शब्दातून
नाहीतर खोल हृदयातच राहतीलल बरे
काही शब्द आणि भावनांचे असते
मुक्कामाचे स्थान वेगळे

म्हणून म्हणते काही कविता
कागदावर उतरतात
आणि काही नुसत्या खोल आत
एकमेकांशी बोलतात




योगा  योगाच्या  गोष्टी देखिल,
नियातिलिखित  असतात म्हणे.
आपण त्याला स्वीकारतो नाहीतर,
काढत बसतो त्यात उणे -दुणे .

मला एक घरं हवंये

मला एक घरं  हवंये..
फक्त स्वताच्या मर्जीने राहण्यासाठी.
आणि एक कोरं  मन..
हवं असलेलं  कोरण्यासाठी.

एक प्रेमळ हृदय.. 
फक्त  मला जपण्यासाठी.
नको गैरसमजही..
फक्त माझ्या भावना जपण्यासाठी.

चुका नको काढायला..
अलगद झेलावं फुलाप्रमाणे.
रिमझिम पावसात हवं तेव्हा..
नाचून घ्यावं लहान मुलाप्रमाणे.

देवाप्रमाणे नको  कुणी.. 
देवच हवा आहे मला. 
कारण हे सगळे गुण.. 
असतात कुठे प्रत्येक जीवात ?

मग… मग मला मीच  हवी आहे बहुदा..
स्वतावर प्रेम करणारी,जपणारी,नाचणारी ,
टिवल्या-बावल्या आणि निराशाही 
पक्ष्याप्रमाणे अलगद झटकणारी..
 हो तीच.. 

Monday 22 April 2013

मन मोकळं  वागण्यालाही...
इथे जबरी शिक्षा असते.
कळत  नाही इतकी छोटी का...
मानवी मनाची कक्षा असते?

Monday 21 January 2013

मनपिल्लू!

वेचलेले सगळेच,
पेरण्यासारखे  नसते.
मुठीत आलेले सगळे,
झेलण्यासारखे नसते.

असे कितीसे व्यर्थ,
येउन मिळते आपल्याला.
अर्थ नसतात त्याला,
जाणीव असते आपल्याला.

म्हणून म्हणतात काहीकाही.
सोडून  द्यायचे असते. 
नाहीतर इवलेशे मनपिल्लू,
त्याला देखील फसते. 

अस्मिता :)

Thursday 3 January 2013

Its been a long time i didn't write anything.The only reason is these days am getting blocked and although i wish to write something interesting I can' t.I learnt a term in my graduation writer's block..so that's perfectly fine.but this new year i decided to write  as more as possible and shard my kind everyday written blog and spend some more interesting time with you people.Hope i will follow it rather my mind..:-)Wishing you all Happy puppy new year!

Pages